
भारतीय जनता परकीय सत्तेच्या अंमलाखाली जीवन जगत होती. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातसुद्धा आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी परकीय शाह्यांचा अंमल होता. अठरा पगड जातीतला बहुजन समाज परकियांच्या सैन्यात सहभागी होऊन परकियांसाठी स्वतः च रक्त सांडत होता. परकियांच्या अंमलाखाली जीवन जगत असताना स्वतःच राज्य निर्माण करावं असा विचार कोणाच्याही मनात येत नव्हता. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे लखूजीराव जाधव व म्हाळसाराणी यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. लखूजीराव जाधव हे निजामशाहीमध्ये सरदार होते, शहाजी राजेंचे वडील मालोजीराव हे सुद्धा निजामशाहीमध्ये सरदार असल्यामुळे आणि मालोजीराव व लखूजीराव हे नातेवाईक असल्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले होते. निजामशाहीमध्ये या जोडीचा वेगळाच दरारा होता.18 मार्च 1594 रोजी मालोजीराजे व उमाबाई यांच्या पोटी शहाजी राजेंचा जन्म वेरूळ येथे झाला होता.
पुढे 1610 मध्ये जिजाऊ व शहाजीराजे यांचा विवाह झाला. एकीकडे परकीय सत्तेसाठी रक्त सांडण्याचं काम रयत करत होती. तर आदिलशाही व मुघलशाही निजामशाहीचा घास घेण्याचा प्रयत्न करत होती. परंतु शहाजी राजे अडसर ठरत होते. निजामशहा नजरकैदेत असल्यामुळे बाल निजामाला गादीवर बसवून शहाजीराजेंनी बाल निजामाच्या नावाने राज्यकारभार चालवावा, निजामाच सैन्य वापरून स्वराज्य निर्मितीकडे वाटचाल करावी असा सल्ला जिजाऊंनी शहाजी राजेंना दिला होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न शहाजी राजे करत होते तर तिकडे आदिलशाही आणि मुघलशाही षडयंत्र रचून बाल निजामाच्या बडी आईस फितूर करण्याचा प्रयत्न करत होते. बाल निजामाची बडी आई फितूर झाल्याची बाब शहाजी राजेंच्या लक्षात आल्यानंतर शहाजी राजेंनी पुढे काय करावे या साठी जिजाऊंचा सल्ला घेण्यासाठी हेरांना पाठवले होते. त्यावेळी जिजाऊ सिंधखेड राजा या आपल्या माहेरी होत्या, हेराकडून आलेला खलिता वाचल्यानंतर लेखनिकास बोलावून जिजाऊंनी शहाजी राजेंसाठी खलीत्यामध्ये काही सूचना केल्या होत्या. त्या मध्ये जिजाऊंनी सांगितलं होतं की मोगल, निजाम व आदिलशहा हे राजकीय वैरी आहेत, आता त्यांच्यामध्ये फूट पाडण्याशिवाय पर्याय नाही. आपण आदिलशहा व मोगलशहातच फूट पाडू. आदिलशहाला सुद्धा शहाजी राजेंची गरज होती. शहाजीराजे जर आदिलशहा सोबत गेले तर शहाजहान एकटा पडेल. आणि आदिलशाही मजबूत होईल. म्हणून निजामशाही सोडून तुम्ही आदिलशहाकडे जावे हा सल्ला जिजाऊंनी खलित्यामध्ये दिला होता.
हेराकडून शहाजी महाराजांना जिजाऊंनी दिलेला खलिता मिळाला. शहाजी राजेंनी खलित्यातल्या सूचना वाचल्या आणि निजामशाही सोडून आदिलशहाकडे गेले. मुघलबादशाह शहाजहानला काय करावं काही कळेना म्हणून त्याने उत्तरेत जाण्याचा निर्णय घेतला. आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकची जहागीरी दिली शिवाय पुणे – सुपे – जुन्नर नाशिक व त्रंबकचा काही भाग खासगी जहागिरी म्हणून शहाजीराजेंनी स्वतः कडे ठेवला. त्याचाच फायदा पुढे स्वराज्य निर्मीतीसाठी शिवरायांना झाला. पुणे सुपे हा परिसर शहाजी राजेंनी स्वतः कडे ठेवावा हा सल्ला सुद्धा जिजाऊंचाच. जिजाऊंचा राजकीय, सामाजिक अभ्यास दांडगा होता. त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता अफाट होती. स्वकीयांचं राज्य असावं रयतेचे राज्य, स्वराज्य असावे हा विचार सर्वप्रथम मांडून मराठी सैन्नामध्ये स्वराज्याची ज्योत पेठवणाऱ्या माँसाहेब जिजाऊच होत्या. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवबाचा जन्म झाला. शिवरायांना रणभूमी, युद्धभूमी, तलवार बाजी, अचूक न्यायदान इत्यादी शिक्षण जिजाऊंच्या नेतृत्वातच झालं होतं. पुणे जुन्नर चा परिसर शहाजी राजेंनी स्वतः कडे ठेवला होता. त्या दरम्यान पुणे बेचिराख झाले होते. आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने पुण्याची भूमी शापित करून ठेवली होती, बारा फुटी पार रोवून त्यावर फाटकी चप्पल, झाडू, वगैरे वस्तू लावून ही भूमी जो कसेल त्याचा निर्वंश होईल असा शाप दिला होता, तीच भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून जिजाऊंनी त्या भूमिला सुपीक केले. त्याच भूमीतील जागेत लालमहाल बांधला.जिजाऊ ह्या अंधश्रद्धा वगैरे मानणाऱ्या नव्हत्या हे यावरून लक्षात येते.
पुणे सुपे जुन्नर नाशिक चा भाग जरी शहाजीराजेंकडे असला तरी किल्ले मात्र आदिलशहाच्या ताब्यात होते. शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातील किल्ले जिंकून स्वराज्यनिर्मितीला सुरुवात करावी हा विचार सुद्धा जिजाऊंचाच कारण ज्या वेळी तोरणा किल्ला जिंकला त्यावेळेस शिवराय हे फक्त 14 वर्षाचे होते. पुढे अफजल खान शिवराय भेटी दरम्यान शिवरायांना अफजल खानाच्या सैन्याची, अंगरक्षकाची, अफजल खानाच्या खोडीची गुपित माहिती काढून घेण्याचा शिवरायांना दिलेला सल्ला सुद्धा जिजाऊंचाच. यावरून जिजाऊ राजीनिती मध्ये निपुण होत्या हे स्पष्ट होतं तसेच स्वराज्याच्या धाकधुकीच्या काळात संसार सांभाळून माँसाहेब जिजाऊ ह्या रयतेसाठी रयतेच्या राज्यासाठी किती तत्पर राहत होत्या हे सिद्ध होतं.शिवरायांची स्वराज्य निर्मितीकडे चांगली वाटचाल सुरु होती. रयत जिजाऊंच्या मातृछायेखाली एकत्र येत होती. अठरा पगड जातीना घेऊन स्वराज्य निर्मितीच काम शिवराय करत होते.6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. शिवराय राजे झालेले, रयतेचे राजे झालेले पाहून जिजाऊंना खूप आनंद झाला. परंतु राज्याभिषेकानंतर दहा बारा दिवसांनीच म्हणजे 17 जून 1674 ला जिजाऊंच निधन झालं आणि स्वराज्यावर शोककळा पसरली. रयत दुःखाने नाहून निघाली. अश्या या रयतेचं मातृत्व शिवरायांची मातृछाया, स्वराज्य संकल्पिका असलेल्या माँ साहेब जिजाऊंना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. जय जिजाऊ… लेखन -परमेश्वर बनकर
