कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील विज्ञान मंडळाअंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ. पंडित विद्यासागर लिखित जागतिक, तसेच भारतीय संशोधकांची खडतर वाटचाल कथन करणारे काव्यगाथा “ओवी गाऊ विज्ञानाची” या पुस्तकाचे अभिवाचन होणार आहे. लेखकाने प्रस्तुत पुस्तकातून ओवीबद्ध रचनेतून विज्ञान समजावले आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन दि. २८/०२/२०२५ रोजी माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांचे ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान’ या विषयावर वेळ १०.०० ते ११.०० या वेळेत व्याख्यान होणार आहे. त्याच दिवशी ११.३० ते १२.३० या वेळेत ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या पुस्तकात ७१ वैज्ञानिकांची चरित्रे दिली असून, त्यात २८ भारतीय वैज्ञानिक, तर ४३ वैज्ञानिक पाश्चात्त्य आहेत.
भारतीय वैज्ञानिकांत जसे चरक, सुश्रुत, वराहमिहीर, भास्कराचार्य यासारखे जुने वैज्ञानिक आहेत, तसेच जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भाटकर यांसारखे आधुनिक आणि हयात असलेले वैज्ञानिकही आहेत. सदर संहितेचे वाचन ‘संध्या रायते’ आणि ‘सुधीर मोघे’ करणार असून ओवीवाचन ‘मीनल गानू’ या करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. सदर उपक्रमाचे संयोजक विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एस. एस. गायकवाड हे आहेत.
