
श्रीगोंदा : सध्याच्या परिस्थितीत लग्नाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे मुलाचे आई -वडील जशी मिळेल तशी मुलगी आपल्या मुलासाठी करण्यासाठी तयार होत आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा काही जण घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यामुळे फसवाफसवीचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही मध्यस्थि लोकांचा हा तर बिजनेसच झाला आहे. मुलासाठी मुलगी शोधून वैतागलेले मुलाच्या घरचे या एजंटांच्या नादी लागून अनेकदा मोठी फसवणूक देखील झाल्याचे निदर्शनास येत आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात समोर आला आहे . एजंटमार्फत लाखो रुपये देऊन लग्न करून घरी आणलेल्या नवरी मुलीने अगोदरच सुमारे ११ मुलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. याबाबत मुलाकडच्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लग्नात फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. त्याच्या विवाहाबाबत नातेवाईक व एजेंट लोकांकडे अर्जदाराचे आई-वडील विचारपूस करीत होते.
त्यावेळी तालुक्यातील एका इसमाने लग्नासाठी मध्यस्थी करत मुलीच्या स्थळाबाबत सांगत “मुलींची संख्या कमी असल्यामुळे लग्न जमविण्यासाठी खर्च करावा लागेल, असे सांगत नवरी मुलीला आणि पुणे येथील मध्यस्थी करणाऱ्या महिलेला २ लाख ६० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवत दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम करत लग्न जमवत लगेच साखरपुडा केला. दि. ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशीच २ लाख ६० हजार रुपये देऊन आळंदी येथील धर्मशाळेत विवाह पार पडला. दि. १३ नोव्हेंबर रोजी सोळाव्याची पूजा सुरू असताना पुजेसाठी आलेल्या महिला नातेवाईकाने नवऱ्या मुलाच्या आई-वडिलांना नवरी मुलीशी तिच्या मुलाचे अगोदरच लग्न झाले असल्याचे सांगत नवऱ्या मुलीने त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन पळून गेली असल्याचे सांगितले.
ही चर्चा सुरू असताना नवरी मुलगी मध्यस्थी महिलेसोबत तेथून निघून गेल्याने नवऱ्या मुलाची आणि कुटुंबाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. मुलाच्या नातेवाईकांनी फसवणूक झाल्याने मध्यस्थीकडे दिलेल्या पैशाची मागणी सुरू केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.
