
श्रीगोंदा : राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत गेल्या वर्षभरापासून लसणाचा दर टिकून आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला २० ते ५० क्विंटलदरम्यान आवक होत आहे. लसणाला सुमारे ३५ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. बाजार समितीत आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
घोडेगाव व अन्य बाजारात बियाण्यांसाठी खरेदी होणाऱ्या लसणाला ४५० रुपये किलोपर्यंत दर मिळाला आहे, असे सांगण्यात आले. राज्यात कांद्याचे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, सातारा, पुणे येथील काही भागांत लसणाचे उत्पादन घेतले जाते. नगर जिल्ह्यातील काही गावांत तर केवळ लसणाचेच उत्पादन घेतले जाते. लसणाला साधारणपणे ५० ते १०० रुपये क्विटंलपर्यंत दर मिळतो. यंदा मात्र वर्षभरापासून लसणाचे दर टिकून आहे. सध्या लसणाच्या लागवडीचे दिवस आहेत. त्यामुळे बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
