
श्रीगोंदा : महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन व पुरातन वारसा जतनासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या शिलेदारांना नगर तालुक्यातील अकोळनेर येथे मध्ययुगीन दुर्मिळ दगडी चक्रव्यूह शिल्प कोडे शोधण्यात यश आले आहे.
शिवदुर्गच्या शिलेदारांनी गवताने वेढलेले हे शिल्पकोडे शोधून येथे स्वच्छता अभियान राबवले. चौकोनी आकाराच्या या दगडी शिल्पामध्ये समोरासमोर तोंड असणाऱ्या दोन नागांनी एकमेकांना गोलाकार ६ वेटोळे घातल्याचे दिसून येते. या शोधकार्यासाठी मारुती वागसकर, प्रदीप भोर व जगन्नाथ भोर यांनी परिश्रम घेतले. ‘महाराष्ट्रात असे सर्पिलाकार चक्रव्यूह मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, ही संरचना काही विशिष्ट उद्देशाने तयार केलेली असावी.’ अशी माहिती इतिहास संशोधक व शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.
