
श्रीगोंदा : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळालेली असून, थोड्याच दिवसात श्रीगोंदा येथे विधी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय सुरू करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सदर प्रस्तावाची विद्यापीठामार्फत व शासनामार्फत छाननी होऊन सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सदर लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली आहे.
श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुला मुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय दूर होणार आहे. श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फार मोठा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे. लॉ कॉलेजला मंजुरी मिळाल्यामुळे राजेंद्र दादा नागवडे यांचे अभिनंदन होत आहे.
