
संतोष रा. कोथिंबीरे
श्रीगोंदा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. गरीब आणि होतकरू महिलांना महिन्याला या योजनेतून 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी महिला वर्ग आतूर झाल्या आहेत. मात्र या योजनेसाठी सरकारने काही अटी आणि शर्थी घालून दिल्या आहेत. त्यामुळे महिलावर्ग कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करताना दिसून येत आहेत.
दोन – दोन दिवस सेतू केंद्रात हेलपाटे मारूनही काम होत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. काही महिला लहान मुले घेऊन येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दाखले काढण्यासाठी आलेल्या महिलांची तारांबळ होत आहे. काही महिला मजुरी करत आहेत. मजुरी बुडवून महिला कागद पत्रे काढण्यासाठी येत आहेत. एकंदरीत दाखले काढण्यासाठी महिलांच्या नाकीनऊ येत आहेत.
या महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ज्या महिला नेतेगिरी करत फिरत आहेत. त्या महिला नेत्या खरंच लाडक्या बहिणीच्या मदतीला येतील का? असा प्रश्न आहे. एका महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन दिवसापासून तलाठी कार्यालयात उत्त्पन्ननाचा दाखला काढण्यासाठी हेलपाटे मारीत आहे. सकाळपासूनच रांगेत उभे राहूनही काम होत नाही. कागदपत्रामुळे रानातील काम खोळंबली आहेत. अशी खंत महिलेने ‘G news’ बोलताना व्यक्त केली.
कित्येक महिलांकडे जन्म दाखला नाही. कित्येकांनी शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. आमची ग्रामपंचायतीमध्ये साधी जन्म नोंदही नाही. मग अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही का?
– सुप्रिया आळेकर
श्रीगोंदा
