
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील मखरेवाडी येथे बुधवारी लिंबूविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना लिंबू बागेवर येणारे रोग व रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मृग, हस्त व आंबेमोहर यांचे संगोपन व व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती दिली. यावेळी जवळपास दीडशे शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना शिवपुरी पुरी, संजयकुमार सुद्रीक, डॉ. एस. एस. कैशिक, डॉ. एस. एस. दहातोंडे, डॉ. मधुकर शेटे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, धनंजय शिंदे, धनराज दिशेटवर, सनी काटे, महेश वसाईकर मार्गदर्शन केले.
लिंबूउत्पादक फार्मर्स प्रोडुसर कंपनीचे अध्यक्ष गोरख आळेकर म्हणाले, की श्रीगोंदा हे लिंबाचे आगार आहे. लिंबाला जी आय मानांकन मिळाले पाहिजे. त्यासाठी लिंबूउत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. लिंबावर प्रक्रिया उद्योग व लिंबू निर्यात करण्यासाठीच लिंबूउत्पादक फार्मर्स प्रोडूसर कंपनीची स्थापना केली आहे. लिंबूउत्पादक शेतकऱ्यांनी या कंपनीचे सभासद व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व लिंबूउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबळे यांनी केले. आभार नंदकुमार घोडके यांनी केले.
