श्रीगोंदा : राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागाचा पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात गेल्या 2ते 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक गावांना टँकरणे होणारा पाणिपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. त्यामुळे तालुक्याचा पाणी1प्रश्न गंभीर झाला होता. मात्र यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होईल. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीसह जनावरांसाठी लागणाऱ्या चारा पिके लागवडीस सुरुवात केली आहे. फळबागांना जीवदान : गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरींनी लवकरच तळ गाठला होता. त्यामुळे चारापिकांसह फळ बागा जळण्याच्या मार्गावर होत्या. कमी पाण्याचा फटका लिंबू बागांना मोठ्या प्रमाणात बसला. कमी पाणी आणि तीव्र उष्णतेमुळे लिंबू गळून गेल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकर आलेल्या पावसामुळे लिंबू बागांना जीवदान मिळाले आहे.
