
कोपरगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी महाविद्यालयात जे विविध उपक्रम चालवले जातात. या उपक्रमांमधील ‘भित्तिपत्रक’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन, संभाषण या कलागुणांना वाव मिळतो. महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या मनात अंकुर रुजवण्याचे कार्य करत असते. भविष्यात त्याचा वटवृक्षही होऊ शकतो”. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील मराठी विभागाने ‘अभिजात मराठी भाषा’ या महत्त्वपूर्ण विषयावर ‘अंकुर’ भित्तीपत्रकाचे सोमवार (दि. १० )रोजी अनावरण प्राचार्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी मराठी विभागातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. या उपक्रमातून निवडक असे लेख निवडून महाविद्यालयाचा आरसा असलेल्या ‘कल्पतरू’ या वार्षिक विशेषांकात छापले जातील, त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवर्जून सांगितले.
या उपक्रमाचे प्रास्ताविक व प्राचार्यांचे स्वागत डॉ. उज्वला भोर यांनी केले. आभार कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, प्रा.डॉ. रंजना वर्दे. प्रा.डॉ. घनश्याम भगत, भीत्तीपत्रक समितीचे चेअरमन प्रा. महेश दिघे, डॉ. रावसाहेब दहे, प्रा. चांदण साबळे व मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
