
श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्यता अभियान २०२५ संपूर्ण राज्यामध्ये राबविणे सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आजपर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्यातील १.५ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदारसंघात आढावा बैठक होत आहेत. त्याच अनुषंगाने श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघ सदस्य नोंदणी आढावा बैठक मा. आ.बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आ. विक्रमसिंह पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी आयोजित केली होती.
भाजपा संघटन पर्वाअंतर्गत श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांना किमान १ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आ. पाचपुते यांनी बैठकीमध्ये उपस्थित सर्वांना दिले आहे. भविष्यात सर्व निवडणुकीत, पदावर, भाजपा कार्यकारणीत, विशेष कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय समिती सदस्य, तालुका व जिल्हा स्तरावर पक्षांतर्गत काम करण्याची संधी हवी असेल, त्यांनी वैयक्तिक किमान १ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले. एक हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर विक्रम भोसले यांचा आ. पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
