
कोपरगाव : सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतामधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि शाश्वत विकासः आव्हाने आणि संधी” या महत्त्वपूर्ण विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन बुधवारी (दि.०५) रोजी करण्यात आले होते.
या चर्चासत्रामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, त्यासमोरील आव्हाने तसेच संभाव्य संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. भारतातील जलसंपत्ती, खनिज संपत्ती, वनसंपदा आणि कृषी संसाधनांच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक धोरणे आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.टी. सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणेचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी आपल्या भाषणात “भारत हा देश विविधतेने नटलेला असून, त्याच्या नैसर्गिक संसाधनांची श्रीमंती आणि भौगोलिक वैशिष्ट्ये अद्वितीय आहेत. या विविधतेच्या योग्य व्यवस्थापनातूनच शाश्वत विकास साध्य करता येईल,” असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. अरुण आंधळे म्हणाले, “शाश्वत ग्रामीण विकासासाठी आणि शेतीवर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे.” प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात नमूद केले की, “चर्चासत्राचा विषय हा संशोधन आणि चिंतनास प्रवृत्त करणारा आहे. शाश्वत विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. पुढील पिढीसाठी पृथ्वीचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. हवामान नियंत्रित ठेवणे, कीटकनाशकांचा संयमित वापर, सिंचन व्यवस्थापन, नद्यांचे संवर्धन, जलसंधारण आणि त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पर्यावरणपूरक व्यवसाय करणे ही काळाची खरी गरज आहे.”
चर्चासत्राच्या प्रथम सत्रात प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांनी प्रतिपादन केले की, “पाणी हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय कोणतीही जीवनशैली, शेती, उद्योग, आरोग्य किंवा शिक्षण यांचा उचित विकास होऊ शकत नाही. पाणी केवळ जीवनासाठीच आवश्यक नाही, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठीही ते अनिवार्य आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नदीजोड प्रकल्पांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.”
प्रथम सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. गणेश चव्हाण यांनी नमूद केले की, “निसर्ग शाश्वत राहिला तरच विकास शक्य आहे.” तसेच, त्यांनी नदीजोड प्रकल्प आणि शाश्वत विकास यांचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. अमित धोर्डे यांनी यांनी नमूद केले की, “भारताच्या शाश्वत विकासात अनेक आव्हाने आणि संधी उपलब्ध आहेत. या आव्हानांची अभ्यासकांना जाणीव असणे अत्यावश्यक आहे,” ‘असे त्यांनी आवर्जून सांगितले. द्वितीय सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात आर. बी. एन. बी. महाविद्यालय, श्रीरामपूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. संजय सांगळे म्हणाले की, “शाश्वत विकासासाठी हरितक्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.”
सेमिनारच्या समारोप प्रसंगी त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ढोरजळगाव येथील प्राचार्य डॉ. सुनील चोळके यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “मृदा ही एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे, परंतु मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे तिचा हास होत आहे. त्यामुळे तिचे योग्य संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे.”

समारोप प्रसंगी डॉ. संजय सांगळे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. चर्चासत्राचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रभान चौधरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. देविदास रणधीर यांनी करून दिला. वेगवेगळ्या सत्राचे आभार प्रा. प्रदीप जगझाप, प्रा. जकारिया शेख, प्रा. प्रदीप झोळ यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन सोनवणे यांनी केले. या चर्चासत्रामध्ये २८३ अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आदरणीय भगीरथकाका शिंदे व सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) प्रमुख डॉ. नीलेश मालपुरे, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.
