
संतोष रा. कोथिंबीरे
श्रीगोंदा : विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मतदार संघातील जागा आपल्याच पक्षाला कशी मिळेल, यासाठी महाविकास आघाडी व महायुतीतील कार्यकर्ते वरिष्टांकडे पाठपुरावा करीत आहेत. सध्या प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या डझनभर असल्याने तिकीट वाटपावेळी वरिष्ठानची डोकेदुखी ठरणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातही महायुती व महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी बरेचजण इच्छुक आहेत. श्रीगोंद्यात भाजपचे बबनदादा पाचपुते हे सध्याचे आमदार आहेत. त्यामुळे ते स्वतः किंवा मुलगा विक्रमसिंह यांना तिकीट मिळण्यासाठी आग्रही आहेत. विक्रमसिंह व प्रतापसिंह हे दोघही तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका, गाठीभेटी घेत आहेत.
दुसरीकडे महायुतीच्या घटक पक्षातील (राष्ट्रवादी अजित पवार ) गटाच्या महिला जिल्हा अध्यक्षा अनुराधाताई नागवडे या आमदारकीसाठी इच्छुक आहेत. पक्षप्रवेशावेळीच अजितदादांनी आमदारकीचा शब्द दिला असल्याचे राजेंद्रदादा नागवडे व अनुराधाताई हे दोघे जाहीर कार्यकामांतून सांगत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल्याने महाविकास आघाडीत चैत्यन्याचे वातावरण आहे. तालुक्यात लोकसभेला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्ष तिकिटासाठी जोरदार प्रयत्न करतील. राष्ट्रवादीडून (शरदचंद्र पवार गट ) माजी आमदार राहुल जगताप हे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी तशी ताकद दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे बीआरएस पक्षातून काँग्रेस पक्षात आलेले व गेल्या वेळेस आमदारकीची थोडक्यात संधी हुकलेले घनश्याम अण्णा शेलार यावेळी सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
शिवसेना (ठाकरे गट ) या पक्षाकडून उमेदवारीसाठी साजन पाचपुते दावा करू शकतात. एकंदरीत परिस्थिती पाहता तालुक्यातील उमेदवारीचा पेच कसा सोडवायचा, हा प्रश्न सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विचार करायला लावणारा आहे. उमेदवारी देताना बंडखोरी तर होणार नाहीना हे सुद्धा वरिष्ठाना पाहावे लागणार आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी अन बंडखोरीची शक्यता : राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, दत्ता पानसरे ऐनवेळी इतर पक्षाकडे उमेदवारी मागू शकतात किंवा बंडखोरी करुन अपक्ष उभे राहू शकतात.
