
श्रीगोंदा : निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव, तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी शेतकरी आंदोलन होणार आहे. आंदोलनाचा इशारा पूर्वीच नीलेश लंके यांनी दिला होता. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना आंदोलन करता आले नाही. शुक्रवारी सकाळी 10 वाजता या आंदोलनास सुरूवात होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
आंदोलनासंदर्भात खा.लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राज्यातील कांदा व दूधउत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोसळत आहेत. सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दूधउत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतु, अनुदानाच्या जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ हेात नाही.
सरकारच्या धोरणांमुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालासंदर्भातील चुकीचे धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेती औजारे यांच्या माध्यमातून जीएसटीचा शेतकऱ्यांवर बोजा पडलेला आहे. मात्र देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. विविध शेतकरी संघटनांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
