
संतोष आर. कोथिंबीरे
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषदेचा कार्यकाळ उलटून जवळपास एक वर्षे होऊन गेले आहे. पण जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत नगरपरिषदेची निवडणूक होणार नाही, असे जरी असले तरी नगरपरिषदेची निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तर काही कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. आधीच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी डजनभर इच्छुक असणाऱ्यांमध्ये आणखी एका ‘साहेबां’ची भर पडली आहे.
श्रीगोंद्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून मुलुंड (मुंबई) येथे कार्यरत असणारे व नुकतेच उपपोलीस अधीक्षकपदावरून सेवानिवृत्त झालेले कांतीलाल दादाराम कोथिंबीरे (साहेब ) यांची एन्ट्री झाली. लोकसभेपासूनच त्यांनी श्रीगोंद्याच्या राजकारणात प्रवेश केला. विधानसभेला अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी मोठ्या जबाबदारीने सांभाळली होती. त्यातूनच त्यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा श्रीगणेशा केला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीला अजून अवधी असला तरी त्यांनी श्रीगोंदा शहरासह तालुक्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह कार्यकर्ते आग्रही आहेत. एकंदरीतच आयुष्यभर पोलिसी खात्यात काम करणाऱ्या व कडक शिस्तीच्या साहेबांना श्रीगोंदेकर किती प्रमाणात स्वीकारतात, हे नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतरच समजेल.
लग्नसमारंभातून करताहेत समाजप्रबोधन : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात होणारे विविध कार्यक्रम व लग्नसमारंभाला भेटी देत साहेब पोलीस खात्यात आलेले कटू अनुभव सांगून हुंडाबंदी, व्यसनाधीनता, सासूने सुनेचा छळ करू नये, सुनेने सासूला आईप्रमाणे वागवण्याचा सल्ला देतात. नववधू -वराला आई-वडिलांबरोबरच समाजाची सेवा करण्यास ते सांगतात. तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्यास ते सांगतात. एक प्रकारे विविध कार्यकमांना हजेरी लावून ते समाजप्रबोधनच करत आहेत.
श्रीगोंदा शांततामय शहर अशी ओळख पुन्हा मिळून देणार का?
एकेकाळी शांततामय शहर अशी श्रीगोंद्याची ओळख होती. ती ओळख कुठेतरी नाहीशी होत आहे. शहरात अवैध धंध्याबरोबर व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात मुख्य रस्त्यावर होणारी सततची वाहतूक कोंडी असे एक ना अनेक प्रश्न शहरात आहेत. साहेबांना जर श्रीगोंदेकरांनी सेवा करण्याची संधी दिली तर, शहराच्या विकासाबरोबरच ते नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आपल्या पोलिशी खात्याचा अनुभव किती प्रमाणात उपयोगात आणतात, ते पाहावे लागेल.
